आपल्या भारत देशात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले आहेत. मात्र कोल्हापूरच्या Kolhapur संस्थानाच्या राजर्षी शाहू महाराजांना Shahu Maharaj “महाराजांचा महाराजा” म्हणून संबोधले जाते.
शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. यामुळे शोषिच वंचित घटकांना नवजीवन मिळाले. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण शाहू महाराजांनी घेतलेले निर्णय जाणून घेणार आहोत.
शाहू महाराजांनी घेतलेले महत्वाचे निर्णय
१. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून त्यांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर जास्त भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले.
२. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली, आणि याची अंमलबजावणी न झाल्यास कठोर शिक्षेची तरतुद केली.
३. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद करुन एकाच शाळेत सवर्ण आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या घटकांना शिक्षणाची सोय केली.
४. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. तसेच इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
५. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले.
दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली.
अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली. गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले.
६. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान, चांभारांना यांना सरदार, अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.
७. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली.
घोषणा केल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी करुन संबंधित अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. यामुळे शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणून संबोधले जाते.
८. त्या काळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करुन ही पद्धत बंद पाडली.
९. जातिभेदाचे प्रथा नष्ट व्हावी, म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली.
आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाचा कायदा तयार केला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतआपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले.
१०. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा धनगर विवाह घडवून आणले.
राजर्षी शाहू महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्याचबरोबर मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून शाहू महाराजांना “राजर्षी” ही पदवी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय सभेने दिली.