राज्यात नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.नागपूरच्या अर्कजा देशमुख या विद्यार्थिनीने डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून पहिला क्रमांक पटकावला आहे. वडिलांचे छत्र हरवूनही तिने घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
ती बारावीत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने तिला खूप मोठा धक्का बसला होता. त्यातून तिने स्वतः बरोबर कुटुंबालाही सावरलं. तिने पाहिले यावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती.
वडीलांच्या जाण्याने अनेक संकटाना तिला सामोर जावं लागलं. अशा परिस्थितीत तिने बारावीचा अभ्यास सुरू ठेवला. अभ्यासाचे योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमातून तिने ९६.३३ टक्के मिळवले. तिने विज्ञानशाखेतून ६०० पैकी ५७८ गुण मिळवले.
त्याचबरोबर दहावीच्या परीक्षेत तिला ९८ टक्के मिळाले आहेत. यावर्षी तिने जेईई उत्तीर्ण करून आयआयटीला प्रवेश मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तिची आई सध्या एका खाजगी शिकवणी वर्गात नोकरी करते. तर तिला एक लहान भाऊ आहे.