महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना पदावरून हटवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांना देखील पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे.
सध्या नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. तर सत्येंद्र जैन देखील भूत कंपन्या, मनी लाँड्रिंग आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांच्या सुटकेचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे अशा स्थितीत त्यांनी पदावर असणे योग्य नाही असे याचिकेत म्हटले आहे.
संविधानिक कलमानुसार एखाद्या मंत्र्याला 2 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर तात्पुरते पदावरून काढून टाकण्यात येते. त्यामुळे या दोघांना देखील पदावरून हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे आता या याचिकेवर लवकरच न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या हातून आपले पद जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य म्हणजे त्यांचे पद वाचवण्यासाठी पक्ष कोणती पावले उचलेल हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.