विधानपरिषदेचा निकाल जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकारणात मोठा घडामोडी पाहायला मिळत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसह नॉटरिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेना विरोधी पक्षनेत्यांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. आता खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना, “बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख, आमदार, खासदार मोठ्या प्रमाणात होते. हा प्रसंग निर्माण झालाय किंवा निर्णाम करण्यात आला आहे. यामागे भाजपचं षडयंत्र आहे. बरेच दिवस जे ऑपरेशन लोटस सुरु होतं. तर तो प्रकार या लोकांनी सुरु केला आहे.
आमच्या आमदारांना अपहरण करुन गुजरातला नेलं नसतं. गुजरात पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांच्या गराड्यात त्यांना ठेवलं नसतं. अनेक आमदारांनी तिथून सुटकेचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दहशत आणि खूनी हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे.” असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी भाजपवर लावले आहेत.
पुढे बोलताना, “काही आमदारांनी कळवलं आहे की, आमच्या जीवाला धोका आहे. इथे आमचा खूनही होऊ शकतो. असं वातावरण का निर्माण केलं जातंय, मला कळत नाही. पण या सगळ्यातून शिवसेना बाहेर पडेल. शिवसेनेचं संघटन पुन्हा एकदा यातून उभं राहिलं. कोणी कितीही म्हणत असलं तरी संघटनेला तडा गेलेला नाही.” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता भाजप काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी सूरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला असल्याचे समोर आले आहे.