उन्हाळी सत्र परीक्षा MCQ पद्धतीने घेण्यात यावी, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी (22 जून) आंदोलन केलं होतं. मोठ्या संख्येने या आंदोलनात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
मात्र दबावाला बळी न पडता परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेण्याच्या निर्णयावर विद्यापीठ प्रशासन ठाम असल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी परीक्षा MCQ पद्धतीने होणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे.
त्यामुळं विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. विद्यापीठाने परिपत्रक काढून परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय जाहीर करावा, अशी मागणी आता विद्यार्थी करत आहेत.
सोलापूर विद्यापीठाने ऑफलाइन परीक्षा MCQ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देखील MCQ पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी केली होती.
ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा घेणं सोलापूर विद्यापीठाला शक्य आहे तर शिवाजी विद्यापीठाला का शक्य नाही, असा सवाल देखील विद्यार्थी उपस्थित करत आहे. पण प्रशासन पारंपरिक पद्धतीने परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचं सांगितलं जातंय.