शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने घेण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मोठं यश मिळाले असून शिवाजी विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांचा परीक्षा MCQ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र अद्याप याविषयीचं अधिकृत परिपत्रक विद्यापीठांने अजून प्रसिद्ध केलेलं नाही. काल विद्यापीठाने परिपत्रक जाहीर करत विधी आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा MCQ पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं.
मात्र फक्त विधी आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा MCQ पद्धतीनं आणि इतर अभ्यासक्रम पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणार असल्याने या असमानतेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता.
आज (24 जून) विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर विद्यापीठावर एका दिवसात निर्णय बदलण्याची नामुष्की आली असून सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा MCQ पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.