राज्यातील राजकारणात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच या पत्रात त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. या पत्रामुळे शिवसेनेत आता खळबळ माजली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधीत पत्र रायगडहून आले असून यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता हे पत्र नक्की कोणी पाठवले असावे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पत्रात थेट अजित पवारांचाच उल्लेख झाल्यामुळे राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान किशोरी पेडणेकर यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी देखील त्यांना अशी पत्रे येऊन गेली आहेत. परंतु अशा पत्रांना धमक्यांना मी घाबरत नाही असे पेडणेकर यांनी म्हणले आहे. सध्या राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच पेडणेकर यांना धमकीचे पत्र आल्यामुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.