सध्या महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळेच वळण लागलेले पाहायला मिळत आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सरकार बरखास्त केले आहे. यानंतर त्यांच्या या निर्णयावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या राजनाम्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरून ट्विट करत, ‘एखादा माणूस ज्यादिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो,’ असे म्हटले आहे. आता उद्धव ठाकरे यांचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू झाला आहे असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाविकास आघाडीला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु न्यायालयाने देखील राज्यपालांच्या बाजूने निकाल सुनावला.
या निकालाच्या थोड्या वेळानंतरच उद्धव ठाकरे यांनी मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यानंतर राजकारणाचे सर्व चित्रच पलटून गेले. मुख्य म्हणजे या सगळ्यात राज ठाकरे नेमकी काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता राज ठाकरे यांनी देखील आपल्या प्रतिक्रियेतून उद्धव ठाकरेंच्या ऱ्हासाचा प्रवास सुरू झाल्याचे म्हणले आहे.