मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर असे करण्यात आले. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेत आले आहे. अजिंठा आणि वेरुळ सारख्या वास्तूंमुळे अगदी जगाच्या कानाकोप-यात औरंगाबादचं नाव प्रसिद्ध आहे. या शहराच्या नावात बदल करणारे अनेक राजे-महाराजे इतिहासात ( History) होऊन गेले आहेत.
काय आहे औरंगाबाद शहराच्या नावाचा इतिहास (History behind name)
औरंगाबाद पुरातन आणि इतिहासाचं वरदान असलेलं शहर आहे. या शहराच्या अंगाखांद्यावर इतिहासनं आपल्या पाऊलखुणा सोडल्या आहेत. बिवी का मकबरा, पानचक्की, ऐतिहासिक दरवाजे, नहर ए अंबरी अशा एक ना अनेक वास्तूंनी या शहराला सुशोभित केले आहे. या शहराचं नावाजलेलं नाव हे खडकी आहे.
हा परिसर बेसॉल्ट खडकावर वसलेला आहे. त्यात शहरात अगदी प्राचीन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले असावे असं इतिहासात नोंद आहे. त्या काळातील अनेक राजांनी या शहराचे नाव नंतर बदलले. यामध्ये फतेहनगर व खुजिस्ता बुनियाद या नावांचा समावेश होतो. नंतरच्या काळात या शहराचे नाव ‘औरंगाबाद’ झाले.
म्हणून ‘औरंगाबाद’ चे झाले ‘संभाजीनगर’
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी मागणी मुळातच शिवसेना या पक्षाकडून मागच्या काही वर्षात केली जात आहे. संभाजी महारांच्या इतिहासाच्या प्रेमापोटी या औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे असा हट्ट शिवसेना व इतर पक्षांकडून केला जात आहे. संभाजी महाराजांचा वध औरंगजेबानं केला आहे. त्यामुळं कदाचित त्या औरंगजेबाचं नाव या शहराला नको असा नेत्यांच्या मागणी मागे सूर होता.