महाराष्ट्र मागच्या काही दिवसांत एक मोठं राजकिय महानाट्य अनुभतोय. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या राजकिय भूकंपामुळे महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार राज्यात उभे राहिले. या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात दररोज नवे बदल होताना पहायला मिळत आहेत. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) या पक्षाने देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
राष्ट्रीय पातळीवरील विभाग होणार बरखास्त
राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय पातळीवरील ( National level) बहुतेक सर्व विभाग व सेल बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हे विभाग वगळून इतर सर्व राष्ट्रीय पातळीवरील विभाग बरखास्त करण्यात येणार आहेत.
म्हणून घेतला निर्णय
पक्ष पातळीवर अंतर्गत निवडणुका सुरू असल्याने संबंधित विभाग बरखास्त करण्याचा निर्णय पवारांकडून घेण्यात आला आहे. हा निर्णय फक्त राष्ट्रीय पातळीवर ठराविक विभागांसाठीच असून महाराष्ट्र अथवा अन्य कोणत्याही राज्यातील कार्यकारिणी किंवा विभागांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
राष्ट्रवादीकडून सध्या 2024 च्या सार्वजनिक निवडणुकांचीही जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात विधानसभेच्या 100 जागांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.