एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना मिळाले आहे. यानंतर शिवसेनेतील अनेक नेते एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात एकमेकांविरोधात जोरदार टीका सुरू आहे. यातच आता शिवसेनेतील नगरसेविका प्रतिभा शिंदे व त्यांच्या पतीने शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे.
प्रतिभा शिंदे या ईश्वरपूर येथील नगरसेविका आहेत. त्यांचे पती शिवकुमार शिंदे सकाळी दूध आणण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली.नगरसेविका प्रतिभा शिंदे यांनी ही मारहाण एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटात सामील होण्यासाठी धमक्या देण्यात येत होत्या. या धमक्या स्थानिक शिंदे गटाच्या समर्थकांकडून देण्यात आल्या होत्या. परंतु आम्ही दोघांनीही यासाठी विरोध केला आणि यामुळेच शिंदे गटाचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व नगरसेवक आंनद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, संशयित पाच ते सहा जणांविरोधात ईश्वरपुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि हल्ला करणाऱ्यांना लवकरच शोधून अटक केली जाईल असे ईश्वरपूरचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितलेले आहे.