गुरुवारी राजस्थानच्या उत्तरलाई एअरबेसवरून उड्डाण घेतलेल्या मिग-२१ लढाऊ विमानाला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत विंग कमांडर मोहित राणा आणि फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बल हे दोघे शहीद झाले आहेत. या दोघांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शेकडो जणांचे प्राण वाचले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी या दोघांनी मिग-२१ बायसन या विमानातून उड्डाण केले होते. मात्र काही वेळातच या विमानाला आग लागली. त्यावेळी हे विमान भीमडा गावाच्या वर होते. यावेळी हे विमान गावावर पडू नये तसेच शेकडो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या दोघांनी परिस्थितीशी दोन हात केले.
गावाला वाचवण्यासाठी कोणताच मार्ग दिसत नसल्यामुळे विंग कमांडर मोहित राणा आणि फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बल यांना विमान गावाच्या दूर नेऊन क्रॅश करावे लागले. परंतु गावाला वाचविताना या दोघांनावर ही शहीद होण्याची वेळ आली. जर हे विमान गावावर क्रश झाले असते तर गावातील शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले असते.
त्यामुळे प्रसंगाशी दोन हात करत विंग कमांडर मोहित राणा आणि फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बल यांनी विमान एका टेकडीवर क्रॅश केले. यामुळे गावावरचे खूप मोठे संकट टळले. आग लागल्यानंतर या दोघांनी गावावरून एक दोन घिरट्या घातल्या होत्या. यामुळे गावातील लोकांना देखील अंदाज आला आणि ते सावध झाले.
दरम्यान मोहित राणा हे मूळचे हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रहिवासी होते. तर अद्वितीय बल हे जम्मू येथील रहिवासी होते. आज या दोघांनी हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.