पक्ष म्हंटल की चिन्ह आलंच. चिन्ह ही पक्षाची ओळख असते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ आहे. परंतु, कधी काळी पवारांना ( Sharad Pawar) चरखा हे चिन्ह हवं होतं. त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न सुद्धा केले होते. इतकेच नाही तर पक्ष स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या बॅनर वर चरख्याचे चिन्ह टाकले होते.
समाजवादी काँग्रेस ( Secular Congress) पक्षाचे चिन्ह चरखा होते
इंदिरा गांधी यांच्यासोबत झालेल्या वादानंतर देवराज उर्स यांनी काँग्रेस पक्ष सोडून समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. या पक्षाचे निवडणूक चिन्ह चरखा होते. यावेळी शरद पवार यांच्यासह अनेक नेते या पक्षात सामील झाले होते.
राजीव गांधी काँग्रेस चे अध्यक्ष झाल्यानंतर शरद पवार पुन्हा काँग्रेस मध्ये परतले व विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची निवड झाली. यावेळी त्यांनी समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून घेतला.परंतु, त्यापूर्वीच 1984 मध्ये समाजवादी काँग्रेस पक्षात सरत चंद्र सिन्हा यांचा वेगळा गट पडला व त्यांनी चरखा या चिन्हावर आपला हक्क सांगितला.
निवडणूक आयोगाने ‘चरखा’ गोठवला
काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी तारिक अन्वर, पी.एस. संगमा यांच्या साथीने 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. यावेळी सरत चंद्र सिन्हा यांनी देखील आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन करत असल्याची घोषणा केली. सोबतच आपल्या पक्षाचे ‘चरखा’ चिन्ह राष्ट्रवादीला देत असल्याचेही मान्य केले होते.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ‘चरखा’ या चिन्हसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला. मात्र निवडणूक आयोगाने समाजवादी पक्ष अस्तित्वात न राहिल्याने ते चिन्ह गोठविण्यात आले असल्याचे सांगितले होते. यावेळी काँग्रेस पक्षाने देखील आक्षेप घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला ( NCP) चरखा चिन्ह मिळाले नाही. शेवटी पवारांना घड्याळावरच समाधान मानावे लागले.