शिवसेनेविरोधात बंड पुकारत राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहेत. शिंदे सरकार स्थापन झाल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी, शिवसेनेतील वाद टोकाला पोहचले आहेत. सध्या हे तिन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या नवीन सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी, “कोणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. त्यामुळं हे सरकार सुद्धा किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. न्यायालयाच्या निर्णयावर बरंच काही अवलंबून आहे” असे म्हणले आहे.
त्याचबरोबर, “रोज माध्यामाकडून मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची विचारणा केली जात आहे. मात्र त्यांच्याकडून लवकरच होईल, असं उत्तर गेले अनेक दिवस आपण ऐकतो आहे. यांच्या या कारभारामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे. आमचं सरकार असताना आम्ही असा पेच निर्माण होऊ दिला नव्हता” अशा शब्दात अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना, “सरकार किती दिवस चालेल सांगता येत नाही. सत्तेत असताना मंत्री आणि आमदार प्रशासन अधिकाऱ्यांशी कसे वागले, याची फळं सत्तेतून बाहेर पडल्यावर मिळतात. कारण ते प्रशासकीय अधिकारी विरोधात असणाऱ्या नेत्यांना धडा शिकवतात” असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे.