सध्या टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलेले “रियालिटी शो” प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीत पडत आहेत. खास म्हणजे, गाण्यांचे रियालिटी शो आजकाल सोशल मीडियावर चर्चेचा भाग बनत चालले आहेत. ‘रियालिटी शो’ संपल्यानंतर त्या गायकांचे काय होते ते गायक कुठे जातात असे अनेक सवाल आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहेत.
अशा या सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी सिनेसृष्टीतील गायक कौशल इनामदार यांनी दिली आहेत. त्यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रियालिटी शोच्या अनेक गोष्टींचा उलगडा स्पष्टपणे केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “Reality Shows मध्ये येणाऱ्या गायकांचं नंतर पुढे काय होतं? हा प्रश्न मला अनेकदा अनेक लोकांनी विचारला आहे. त्यातले काही गायक आपल्याला दिसतात आणि काही लोकांची नावं नंतर फारशी ऐकली जात नाहीत.
खरं तर या कार्यक्रमांतून झळकलेले सर्व गायक हे आपल्याला रोज दिसत नसले तरी त्यांचं बरं चाललं असतं. काही गायक पार्श्वगायक होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करतात, काही कार्यक्रमांमधून गातात, काही संगीताशी निगडीत इतर व्यवसायात जातात, आणि काही लोक इतर कामं स्वीकारून संगीताचा एक हॉबी म्हणून स्वीकार करतात. Water finds its own level या सिद्धांताप्रमाणेच प्रत्येक गायक आपापली जागा गाठून त्या जागेत सेटल होतो”
https://m.facebook.com/ksinamdar210/posts/2795134560630617
त्याचबरोबर, “अर्थात काही स्वप्नभंगही असतातच – हे आयुष्य आहे आणि स्वप्नभंगाचं दुःख कुणाला चुकलंय? या स्वप्नभंगाचं एक कारण असं आहे की या कार्यक्रमांतून स्पर्धक इतर गायकांची गाणी समर्थपणे सादर करतात परंतु एखाद्या गायकाने गाऊन ठेवलेलं गाणं आणि आपण आपलं स्वतःचं गाणं म्हणणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
इतर कुठल्याही गायकाची छाप त्या गाण्यावर नसताना, थेट संगीतकाराकडून गाणं शिकून ते सादर करणं ही एक वेगळी कला आहे. शिवाय कार्यक्रमात गाणं म्हणणं, स्पर्धेत गाणं सादर करणं याचा skillset आणि गाणं एखाद्या recording studioमध्ये ते गाणं ध्वनिमुद्रित करणं – हा पूर्णतः वेगळं कौशल्य लागणारा अनुभव आहे.” अशा शब्दात त्यांनी रियालिटी शोचे सत्य मांडले आहे.