बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना सर्व सिनेमागृहात पाहता येईल. सध्या आमिर खान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त असलेला दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट सोशल मीडियावर चर्चेचा भाग बनला आहे.
अनेकांनी या चित्रपटावर वेगवेगळ्या प्रकारे टीका केली आहे. त्यामुळे आता गेल्या अनेक दिवसांपासून शांत बसलेल्या आमिर खानने या टीका करणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर दिले आहे. “जर कोणाला चित्रपट बघायचा नसेल तर मी त्यांच्या भावनांचा आदर करतो” अशा शब्दात आमिर खानने आपले मत मांडले आहे.
आमिर खान म्हणाला की, “कोणत्याही गोष्टीबाबत मी कोणाचं मन दुखावलं असेल तर त्याच मला दुःख आहे. मला कोणालाही दुखवायचं नाही. जर कोणाला चित्रपट बघायचा नसेल तर मी त्यांच्या भावनांचा आदर करतो.” सध्या सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड चालविला जात आहे. याबाबतच आमिरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी त्यांने, “काही लोकांना असं वाटतं की मी देश आवडत नसलेल्या व्यक्तींपैकी आहे आणि हे खूपच दुर्दैवी आहे. मी विनंती करतो की, कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. माझा चित्रपट पाहा.” अशी प्रेक्षकांना विनंती केली आहे. सध्या आमिर खानचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.