दरवर्षी पावसाळ्यात अंगावर वीज पडून अनेक जणांना आपला जीव गमवावा लागतो. कारण विजेचा कडकडाट सुरू असताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती बऱ्याच जणांना नसते. या लेखातून आपण विजेचा कडकडाट सुरू असताना नेमकी काय काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी टाळायच्या हे समजून घेणार आहे. lightening precautions in marathi
पावसाळ्यात अनेक लोक विजा चमकू लागल्या आणि पाऊस पडू लागला तर झाडाखाली जाऊन थांबतात. मात्र ही खूप मोठी चूक ठरू शकते. कारण झाड विजेचा सुवाहक आहे आणि त्याच्या उंचीमुळे वीज पडण्याची शक्यता जास्त असते.
त्यामुळे विजेचा कडकडाट सुरू असताना बंदिस्त आश्रय शोधण्याचा प्रयत्न करावा. जसे की घर, ऑफिस, मॉल. जर तुम्ही गाडीतून प्रवास करत असाल तर झाडाखाली थांबण्यापेक्षा किंवा गाडीच्या बाहेर येण्यापेक्षा आत बसलेलं जास्त सुरक्षित असतं.
बाहेर मोकळ्या जागेत असताना काय काळजी घ्यायची?
पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडताना तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडायला हवं. जर तुम्ही फिरण्यासाठी उंच डोंगरांवर गेला तर तिथून लवकरात लवकर सपाट भागावर येण्याचा प्रयत्न करा. झाडाखाली किंवा दगडाखाली आश्रय घेण्याचा प्रयत्न करू नका. विजा चमकायला लागल्यावर तलाव, नदी या सारख्या पाण्याच्या ठिकाणावरून तत्काळ बाजूला व्हा.
शेतात काम करत असताना अनेक शेतकरी विजा चमकायला लागल्यावर झाडाखाली थांबतात. मात्र झाडाखाली थांबणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणं गरजेचं आहे. जपान: ‘या’ रेस्टॉरंटमधील सगळेच वेटर विसराळू आहेत; पण का? वाचा या प्रयोगामागची अभिनव कल्पना
घरात असताना काय काळजी घ्यावी?
आपल्याकडे घर बनवताना मोठ्या प्रमाणात स्टील आणि सिमेंटचा वापर केला जातो. त्यामुळे विजांचा कडकडाट सुरू असताना भिंतीला चिकटून बसू नका. कारण भिंतींमध्ये असणाऱ्या स्टीलमधून देखील वीज वाहू शकते.
जरी तुम्ही घरात असाल तरी देखील तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते. विजांचा कडकडाट आणि गर्जना होत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. कारण जर आजूबाजूला वीज पडली तर घरातील विद्युत प्रवाह अचानक वाढू शकतो. तुम्ही घरात मोबाईलचा वापर करू शकता.
जरी विजांचा कडकडाट थांबला तरी इलेक्ट्रिक चार्जेस (जेव्हा या चार्जेसचा प्रवाह ढगातून जमिनीत काही क्षणात वाहतो, त्यालाच आपण वीज पडणं म्हणतो) काही वेळेसाठी ढगांमध्ये तरंगत असतात. त्यामुळे विजेचा कडकडाट थांबला तरी अर्धा ते एक तासासाठी घराच्या बाहेर पडू नका. हे पण वाचा: येत्या 80 वर्षात मुंबई पाण्याखाली जाणार; जागतिक तापमान वाढीचा परिणाम
अशा प्रकारची काळजी सगळ्यांनी घेतली तर नक्कीच लोकांचा जीव वाचू शकतो.