आजपासून आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. सध्या आदित्य ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी पार पडलेल्या सभेत त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. “गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला, याचं मला दुःख” अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांना सुनावले आहे.
सभेतील भाषणात आदित्य ठाकरे म्हणाले, “आपल्याला देश पुढे न्यायचा आहे. आपलं फक्त प्रेम आणि आशीर्वाद हवे आहेत. माणुसकीसोबत गद्दारी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण त्या गद्दारांनी ठाकरे परिवाराला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख आहे”
त्याचबरोबर, “आमच्यासोबत गद्दारी झाली. पण आम्ही काय चूक केली? गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला, पण त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या रक्तात शिवसेना असती, तर गुवाहाटीला जाऊन मदत केली असती. महापुरातील बाधितांना मदत केली असती’ अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
दरम्यान सभेत बोलत असताना, “ज्याला वाटतं शिवसेनेशी केलेली गद्दारी चुकीची आहे, त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. गद्दारांकडून अनेक कारणं दिली जातात. त्याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे ईडी!” असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.