राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज आज ( दि.22) ट्विट करत याबाबतचा इशारा दिला आहे. याआधीही मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचे नेते व रोहित पवार यांचे चुलते अजित पवार यांच्यावर आरोप केला होता.आता त्यांनी आपला मोर्चा रोहित पवार यांच्याकडे वळवल्याचे पहायला मिळत आहे.
मोहित कंबोज ( Mohit Kamboj) यांनी आमदार रोहित पवार यांच्या बाबतीत सूचक ट्विट ( Tweet against Rohit Pawar) केलं आहे. बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची ( Baramati Agro ltd) केस स्टडी सध्या मी करत आहे असे म्हणत या केस स्टडी संदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येणार आहे, असा इशाराच कंबोज यांनी रोहित पवार यांना दिला आहे.
रोहित पवार काय म्हणाले
“कंबोज यांच्या ट्विटला फारसे महत्त्व देण्याचं काम नाही, मोहित कंबोज यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही,” असे उद्गार रोहित पवार यांनी कंबोज यांच्या ट्विट ला उत्तर देताना काढले.
रोहित पवारांनी घेतली होती फडणवीसांची भेट
काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर भाजपच्या बाबतीत त्यांची मवाळ भूमिका पहायला मिळाली होती. आता मोहित कंबोज यांच्या ट्विट नंतर रोहित पवार काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.