विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन श्रेणीअंतर्गत शिक्षकांची भरती करण्यात येईल, असा निर्णय नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. आतापर्यंत प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी NET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. पंरतु विद्यापीठाच्या निर्णयानुसार येत्या काळात तुमची UGC NET पात्रता नसली तरीही तुम्ही प्राध्यापक होऊ शकता.
काय आहे विद्यापीठाचा निर्णय
मागच्या आठवड्यात झालेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 560 व्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ या योजनेअंतर्गत लवकरच विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची भरती करण्यात येईल. या नवीन योजनेत निवडलेल्या लोकांना सुरुवातीला 1 वर्षासाठी या पदांवर नियुक्त केले जाईल असे विद्यापीठ अहवालात सांगण्यात आले आहे.
निवड व पात्रता
अभियांत्रिकी, विज्ञान, माध्यम, साहित्य, उद्योजकता, सामाजिक विज्ञान, ललित कला, सार्वजनिक सेवा, सशस्त्र दल इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञ या योजनेअंतर्गत भरतीसाठी पात्र असतील. याशिवाय विशिष्ट व्यवसायाशी संबंधित तज्ज्ञ व 15 वर्षांपेक्षा अधिक काळ अनुभव असलेले लोक प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस श्रेणीत येऊ शकतात. विद्यापीठाच्या निर्णयानुसार कुलगुरु किंवा संचालकांना ‘प्रॅक्टिसच्या प्राध्यापक’साठी कोणाची तरी निवड करण्याचा अधिकार असेल.