संदिप डांगे | लोन देणार्या मोबाईल अॅप्सच्या जाळ्यात अडकण्याचे कारण म्हणजे लोकांचा लोभ-मोह किंवा निष्काळजीपणा त्यांना फसवणुकीच्या जाळ्यात अडकायला भाग पाडायचा. आता कोणीही स्वतःचा कोणताही दोष नसतांना अशा फसवणुकीला बळी पडणार आहे.
आजच कळलेली घटना अशी की एका व्यक्तीला थेट फोन आला की तुम्ही लोन घेतले आहे ते लवकर फेडून टाका. त्या व्यक्तीने म्हटले की मी कोणतेही लोन घेतलेले नाही. तर फोनवाल्याने म्हटले तुम्ही अमूक तारखेला ११०० रुपयांचे लोन घेतले होते, त्याचे व्याजासह २००० रुपये होत आहेत ते फेडून टाका. पिडीत व्यक्तिने जेंव्हा बँक डिटेल्स तपासले तेंव्हा त्यांच्या खात्यात ११०० रुपये आलेले दिसले. पिडित व्यक्तीने ‘हे पैसे माझ्या अकाउंटला कसे आले ते मला माहिती नाही, हे लोन मी अप्लाय केलेच नव्हते.’ पिडित व्यक्तीला ‘अकराशे रुपयां’सारख्या छोट्या अमाउंट साठी लोन अप्लिकेशन करण्याची गरज पडावी इतकी त्यांची परिस्थिती नाही.
पण नसते झेंगाट नको, व पैसे बँकेत आलेत म्हणून त्यांनी ते पेमेंट करुन टाकले. पण चार दिवसांनी परत त्यांच्या अकाउंटला अडीच हजार रुपये आले व त्याच्या दोन दिवसांनी फोन आला की ४ हजार रुपये फेडा… अन्यथा तुमच्या सर्व काँटॅक्ट्सला आम्ही तुमचे घाणेरडे फोटो पाठवू…. अशाच स्वरुपाचे शिवीगाळ करणारे भयंकर फोन त्या व्यक्तीला रोज येत आहेत. ही तक्रार घेऊन सदर व्यक्ती सायबरसेलकडे गेली असता, सायबरसेलच्या पोलिसांनी सरळ हात वर केले व आम्ही काही तपास करु शकत नाही असे उत्तर दिले. ‘तुम्ही तुमचे इंटरनेट बंद करा’ असा शहाजोग सल्ला सायबरपोलिसांनी दिला असे त्या पिडित व्यक्तीचे म्हणणे आहे. सदर व्यक्तीचे सोशल मिडिया अकाउंट व फोन डेटा सर्व हॅक झालेला आहे.
वरील सर्व प्रकार अत्यंत भयानक आहे. अशा प्रकरणांशी कसे डिल करावे हे माहिती नसलेल्या लोकांसाठी हे टॉर्चर आर्थिक मानसिक सामाजिक सर्व पातळीवर घातक आहे. यातून इज्जत जाऊ नये म्हणून अमर्याद आर्थिक पिळवणूक पासून आत्महत्या करण्यापर्यंत प्रकरण जाऊ शकते. तेही व्यक्तीचा काहीही दोष नसतांना, आता या फ्रॉड लोकांना निष्पाप लोकांचा फोन किंवा अकाउंट अॅक्सेस कसा मिळतो? व्यक्तीने जरी लोन अॅप डाउनलोड केले नसेल, अप्लाय केले नसेल तरी हे कसे घडते?
हे दोन तीन प्रकारे होते.
1. व्यक्तीने फेसबुक किंवा तत्सम सोशल मिडियावर येणारे गेम्स किंवा प्रश्नांची उत्तरे पहा – यासारख्या गोष्टींसाठी अकाउंटचा अॅक्सेस नकळत दिलेला असतो. तुमचा चेहरा कुणाशी जुळतो, तुमच्या जन्मतारखेचे महत्त्व काय, तुमच्या नावाचा अर्थ काय, इत्यादी प्रश्न हे फेसबुकने तयार केलेले नसतात तर हे थर्ड पार्टी अॅप्स असतात जे तुमच्या अकाउंटचा अॅक्सेस मागतात, जो तुम्ही देऊन टाकता. नंतर तोच अॅक्सेस घेऊन हे करामती करतात.
2. व्हॉटसप किंवा तत्सम मेसेंजर अॅप्सवर तुम्ही कोणतीही अनोळखी लिंक क्लिक केली, काही डिस्काउंट किंवा ऑफर किंवा त्यासारखी काही असणारी लिंक काहीही विचार न करता ओपन केली जाते. यातून मोबाइल डेटाचा कन्सेंट नकळत घेतला जातो. मोबाईलमधील फोटो, कॉंटॅक्ट्सपासून सगळा डेटा हॅकर्सच्या हाती लागतो. त्याचा ते वाट्टेल तसा वापर करु शकतात.
3. आधार कार्ड, पॅन कार्ड, किंवा अशीच माहिती कुठे कोण्या वेबसाईट, बँक प्रणाली, इमेल्समध्ये दिलेली असेल आणि ते हॅकर्सच्या हातात लागले असेल तर…
4. सर्व बँकवाले, फायनंशियल सर्विस प्रोव्हायडर आपला डेटा थर्डपार्टीला बिनदिक्कत विकत असतात. त्यावर कोणाचाही कंट्रोल नाही. काही दिवसांपूर्वी मी अमेझॉनची ‘पे लेटर’ ही सुविधा वापरली तर दोन दिवसांतच मला ‘लोन हवे आहे का?’ असे विचारणारे चार पाच फोन आले. असे अनुभव इतर ठिकाणांहून सुद्धा आले आहेत. परंतु इकडे फक्त आपला नाव नंबर व प्रोफाइल जाते, मोबाईलचा अॅक्सेस जात नाही. (Still it is not acceptable at all. It’s serious crime.) तरी याचीही काही खात्री देता येत नाही.
याच हॅकिंग तंत्राचा वापर करुन बँकेच्या खात्यातून थेट रक्कम लंपास होणे, त्याविरुद्ध कोणतीही तक्रार बँकेने किंवा पोलिसांनी न स्विकारणे या घटना भविष्यात घडतील असे नविन भाकित या प्रसंगी करत आहे. कॅशलेस इंडियाच्या नावाने मिरवून घेणार्या सरकारी यंत्रणांना व राजकीय पक्षांना कदाचित देशाचे नागरिकच ‘कॅशलेस’ व्हायला हवेत अशी इच्छा आहे असे दिसत आहे.
परिस्थिती फारच गंभीर आहे. विशेषतः महिलांनी याची गांभिर्याने दखल घ्यायला हवी.
I request all people and government should immediately take action on this.
( सदर लेख हा संदिप डांगे यांच्या फेसबूक प्रोफाईलवर यापुर्वी प्रकाशित करण्यात आला आहे )