आपल्याकडे Menstrual cycle मासिक पाळी म्हणले की ‘विटाळ’ समजले जाते. आणि हा विटाळ घरी कार्यक्रम असला सणवार असला की स्त्रिया नेहमी गोळ्या खाऊन वेगवेगळे उपाय करून पुढे ढकलतात. समाजात अनेक ठिकाणी सणावाराच्या दिवशी महिलांना मासिक पाळी आल्यानंतर बाजूला बसवले जाते यामुळे घरातली कामे तशीच रखडली जातात. अनेक ठिकाणी मासिक पाळीला अशुद्ध विटाळ असे समजले जाते. या कारणाने अनेक स्त्रिया या गोळ्यांचा मार्ग शोधतात.
पण हे करणे खरंच गरजेचे असते का? याचा फायदा तोटा काय होतो? आणि गोळ्या खाणे हा एकमेव उपाय आहे का? अशा कित्येक प्रश्नाची उत्तरे आपल्याला माहीतच नसतात.
अनेक महिला या मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी डॉक्टरांची परवानगी न घेता मेडिकल गोळ्या घेतात. या गोळ्या घ्या असं स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सांगत नाहीत. तरी देखील कित्येक महिला गोळ्यांचा वापर करताना दिसतात. या गोळ्या घेण्याचे जास्त प्रमाण हे नऊरात्री, गणपती उत्सव काळात असते.
मेडिकलमध्ये या गोळ्या सहज कोणाला ही उपलब्ध होतात. धक्कादायक बाब म्हणजे गोळ्यांच्या कंपन्यांनी उत्सवाच्या कालावधीमध्ये २० ते २५ टक्क्यांची विशेष सवलतही जाहीर केल्याचे प्रकार घडतात. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी घेण्यात येणाऱ्या गोळ्यांचा परिणाम थेट स्त्रियांच्या शरीरावर होत असतो. यामुळे कमी वयात लवकर वेगवेगळ्या आजारांना बळी पडण्याचा धोका स्त्रियांना असतो.
काय होऊ शकतं ?
स्त्रियांच्या शरीरात Estrogen इस्ट्रोजेन आणि Progesterone प्रोजेस्टोरॉन असे दोन हार्मोन्स असतात. त्यावर पाळीचं चक्र आधारित असतं. पाळी उशिरा यावी म्हणून या हार्मोन्सच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. एका परीने या गोळ्या हार्मोन्सच्या चक्रावर परिणाम करतात. नैसर्गिकरित्या चाललेलं पाळीचं चक्र पुढे मागे केल्याचे अनेक वाईट परिणाम होऊ शकतात.
यामुळे नैसर्गिकरित्या सुरू असलेल्या चक्रात अडथळा आल्याने स्त्रियांना प्रचंड प्रमाणात वेदना सहन कराव्या लागतात. स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्स हे जास्त प्रमाणात वाढतात. काही वेळा गोळ्यांचे प्रमाण वाढल्याने स्त्रियांना चक्कर येऊ शकते.
तसेच ब्लड क्लॉट होण्याची समस्या देखील स्त्रियांना उद्भवू शकते. ब्लड क्लॉट होण्याचा त्रास वाढून जर तो मेंदूपर्यंत किंवा हृदयापर्यंत पोहोचला तर मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते. चिडचिडेपणा जास्त होतो, मळमळणे, डोकेदुखी, स्तनामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. स्तन जड झाल्यासारखे वाटू लागतात. अशा कित्येक समस्या गोळ्यांमुळे तयार होऊ शकतात. यामुळे अशा गोळ्यांचा डॉक्टरांच्या परवानगी शिवाय वापर करणे हे धोक्याचेच असते.
नक्की वाचा –
ब्रा आणि स्तनांच्या कर्करोगाचा काही संबंध असतो का?
वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2020, ऐश्वर्या श्रीधर ठरल्या पहिल्या भारतीय महिला