राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाऊन नुकतेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. मात्र महाविकास आघाडीने घेतलेले अनेक निर्णय नव्या सरकारने रद्द केले आहेत.
याच धर्तीवर एक धक्कादायक निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातून परराज्यात शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरील प्रतिष्ठीत महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेत असतात.
मात्र सरकारने परिपत्रक काढून ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती रद्द केली आहे. देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यासंबंधातील परिपत्रक महाविकास आघाडीने 25 मार्च 2022 रोजी जारी केले होते, हा निर्णय नव्या सरकारकडून रद्द करण्यात आलाय.
यामुळे समाजाच्या सर्वच स्तरातून या निर्णयाविरोधात संतप्त प्रतिक्रिया येत असून ही शिष्यवृती पुन्हा सुरु करण्याची मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून होत आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील अनेक विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे.