थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले भारतात समाजसुधारणेची मोठी चळवळ उभा केली. यात त्यांनी सर्वांसमोर सत्यशोधक समाजाची नवी संकल्पना मांडली. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. तसेच त्यांच्या कार्यकाळात दोघांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. यातील महात्मा फुले यांनी केलेली १० महत्वाची कार्य जाणून घेणार आहोत.
महात्मा फुले यांची १० कार्य!
१. ३ ऑगस्ट १८४८ पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. हा देशाच्या इतिहासातील सर्वांत क्रांतीकारी निर्णय ठरला.
२. १८५२ साली महात्मा फुलेंनी देशातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशातील पहिली अस्पृश मुलांसाठीची शाळा सुरू केली.
३. १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापणा करुन ज्योतिबांनी याची संपुर्ण जबाबदारी सावित्रीबाईंकडे दिली.
४. २४ सप्टेंबर १८७३ साली महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील गुलामगिरी, जातीप्रथा नष्ट करुन सर्व समाजांना समान अधिकार मिळावे असा उद्देश होता. यातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेरणा घेतली होती.
५. १८६४ साली महात्मा फुलेंनी पुण्यात गोखले बागेत पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. यानंतर अनेकांनी विधवा महिलांसाठी आवाज उठवयाला सुरुवात केली.
६. १८६८ साली महात्मा फुलेंनी आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.
७. १८७९ पहिल्यांदाच महात्मा फुलेंनी रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.
८. २ मार्च १८८२ रोजी महात्मा फुलेंनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिला. यात त्यांनी सर्व समाजातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं अशी मागणी केली. हाच विचार करुन पुढे शाहू महाराजांनी याची अंमलबजावणी केली.
९. १८८३ साली महात्मा फुलेंनी शेतकर्यांचा आसूड हा ग्रंथ लिहला. आजही हा ग्रंथ शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यासाठी महत्वाचा मानला जातो.
१०. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहला आणि शिवाजी महाराजांना कुळवाडीभूषण ही उपाधी दिली.
यामुळे महात्मा फुले यांचा देशाच्या समाजसुधारणेच्या चळवळीत महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या पाठीमागे सावित्रीबाईंनी देखील ही समाजसुधारणेची चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन सुरु ठेवली.