कविता ननवरे | मागचे दोन दिवस झाले संतोष पद्माकर पवार यांचा बहादूर थापा आणि इतर कविता हा कवितासंग्रह वाचतेय. एखादा संग्रह हातात घेतला की तो पूर्ण वाचून संपायला काही तास किंवा फारतर एखादा दिवस लागू शकतो पण बहादूर थापाच्या बाबतीत वेगळं घडलं. संग्रहातल्या तिसऱ्या कवितेनंतर कवितांमधल्या माणसांचं जगणं अंगावर यायला लागलं. ‘ हिराबाई जाफरमियाँ ‘ या कवितेचा शेवट वाचला आणि पुस्तक खाली ठेवून डोळे मिटून राहिले कितीतरी वेळ.पुढच्या कविता वाचण्याचं बळंच राहिलं नाही. तडक निघून तुळजापूरच्या भवानी मंडपात पोहचावं वाटलं. बांगड्या,चुडे विकत दिवस कंठणाऱ्या हिराबाईचा हातात हात घ्यावासा वाटला. या कवितेचा हँगओव्हर काही केल्या उतरत नव्हता.काही तास फार अस्वस्थतेत निघून गेले. मन घट्ट करून पुढच्या कविता वाचत गेले.
या संग्रहातल्या सगळ्या कविता व्यक्तिचित्रणात्मक आहेत. या कविता म्हणजे एकप्रकारचं कथात्मक पद्य आहे. कोण कोण भेटत जातं आपल्याला या सगळ्या कवितांमधून.! काळ्या आईच्या सेवेत जगणं समर्पित केलेला, कुटुंबाच्या खिजगणतीतही नसलेला,नातवाच्या लग्न बस्त्याची कुणी खबरही न दिल्याने दुखावलेला आणि त्याच दिवशी बरडाच्या वावरात मूठभर हरभरे घट्ट पकडून जीव सोडलेला रभाजी कडलग भेटला.महाराणीची भिकारीन झालेली गुजाबाई धनगरीन भेटली.
तुळजापूरच्या भवानीमंडपात जाफरमियाँनं बदललेलं हिराबाईचं नशीब पुन्हा तिला त्याच भवानीमंडपात कसं घेऊन येतं हे वाचताना अंगावर सर्रकन काटा आल्याशिवाय राहत नाही. कमलाबाई भाऊराव भानुसे आणि तिच्या लेकीचं धाडसीपण व्यवस्थेपुढं कसं चीत होतं हे वाचून व्यवस्थेबद्दलची चीड कैक पटीने वाढली.जिवंत असून प्रेतासारखं आयुष्य जगणाऱ्या चांगू किसन रणमळे बद्दल आपण एक वाचक म्हणून,एक माणूस म्हणून चुकचुकत राहतो. ” साहेब देवाशेजारी देव ऱ्हायलं रातभर त्यांच्यात भांडण नाही झालं. तुम्ही मला कामून धरलं ?” येशू आणि मेरीचा फोटो पडक्या मारूतीच्या देवळात ठेवणारा बाळू पिराजी अशा निष्पाप मनाने प्रश्न विचारतो तेव्हा आपल्यालाही वाटतं ‘ छे कुठे काय चुकलं बाळू पिराजीचं.!’
छावणीतून आलेल्या जवानांच्या तावडीतून कलाकेंद्रातल्या पोरी सोडवताना तीन जवानांचे खून पाडणारी छबू दुसरी झाशीची राणीच वाटते. हिजड्याच्या वेशात आयुष्य काढणारा कल्या माणूस म्हणून कैक पटीनं ग्रेट वाटतो. चित्रकलेच्या मास्तरनं नासवलेलं शैला नावाचं शाळकरी वयाचं मूर्तीमंत सौंदर्य कवीला नगरवधूच्या रूपात एका स्टँडवर वीस वर्षांनी अचानक भेटून कवीसोबत आपल्यालाही निःशब्द करून टाकतं. पिसाळलेल्या कुत्र्यापेक्षा पिसाळलेल्या माणसांचाच बळी ठरलेला सोन्याबापू विसरताच येत नाही लवकर. पाट्यांवर नक्षी काढून देणाऱ्या आईचा डोळा फुटला तेव्हा गुरासारखी ओरडणारी आणि एसटीत शेजारनं छाती दाबली तेव्हा, ” कंडक्टर भाऊ..हे माणूस पहाणा पोराच्या प्यायचं दाबतय.” अशी तक्रार करणारी भोळीभाबडी तम्मा. आपल्या कांचाला भेटण्यासाठी जीव टाकणारा आणि तिला मुंबईत कुणीतरी विकलय या गोष्टीने एखाद्याचा जीव घेणारा बहादूर ‘ बहादूर थापा’.
सुयाबिबं नाहीतर माणूसकीच दारोदार घेऊन फिरणारी प्रेमळ ताई,बँडवाला रोडू, कमनशीबी धुरपदा आणि उर फुटेस्तोवर धावत नशीबावर मात करणारी तिची लेक शारदा. कुटुंब नियोजनाच्या फेल आॕपरेशनची शिकार आणि म्हणून मग चौथ्या मुलीची आई झालेली सरूबाई. खुद्द गावच्या पाटलालाच ‘ दाढी कटिंगण रोकड दाम द्यावा लागल म्हणून फैलावर घेत सुनावणारा न्हाईबाबा. तिनदा बलात्काराची शिकार ठरलेली सोनी, हातभट्टीची दारू विकणारा पण माणूसकी मनात जागवून असणारा बुवा. जातीधर्माच्या चिखलात बुडालेल्या समाजासाठी काही करू इच्छिणारा परंतु त्याच समाजाच्या गैरसमजाचा बळी ठरलेला जाॕन. अनाथालयाच भोगवस्तू म्हणून वापरलेली मुकी, पोटच्या पोराला अख्खाच्या अख्खा फाडून खाताना बघण्याचं प्राक्तन लाभलेला नागू, नाग-साप पकडून देण्यावर पैसे कमावणारा परंतु साप चावून तडफडत जीव सोडलेला बाळ्या गारूडी, साखरवाट्या वाटण्यात आयुष्य घालवलेला आणि मरतेवेळी सगळ्यांची तोंडं गोड करून गेलेला सोमा, जगावेगळा अवलिया कवी फ्रँकी. अशी कित्येक माणसं भेटत जातात संग्रहभर. काळजाचा ठाव घेत अस्वस्थ करतात. हेलावून सोडतात.
मी असा पहिलाच कवितासंग्रह वाचला ज्यातील सगळ्या कविता या व्यक्तीचित्रणात्मक आहेत. गद्यप्रायतेकडे जरी या कविता झुकत असल्या तरी आशय विषयानं त्या संपन्न आहेत. कुणाच्या खिजगणतीतही नसलेली माणसं कवितांचे विषय होऊ शकतात हे संतोष पद्माकर पवारांनी दाखवून दिले आहे.
ज्या कुणाला आपल्या वितभर दुःखाच्या रेषेपुढे दुसऱ्यांच्या हातभर दुःखाशी रेष ओढून आपलं दुःख टिंबाएवढं करायचं असेल तर ” बहादूर थापा आणि इतर कविता” हा कविता संग्रह नक्की वाचावा. कारण या नुसत्या कविता नाहियेत तर कवितेच्या रूपात माणसाच्या चिरंतन दुःखाचं महाभारत आहे.