संविधान गांगुर्डे | बाबासाहेब हे सर्वांचे प्रिय नेते होते. त्यांचे बुद्धीचातूर्य आणि नेतृत्व संपन्नता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मुख्य पैलू असल्याने अनेक बुद्धीवाद्यांना त्यांचे आकर्षण होते. त्यांनी विषमतावादी वैदिक धर्मासमोर उभे केलेल्या आवाहनामुळे अनेक पुरोगामी प्रवाह त्यांच्याकडे आकर्षित होते. त्यांचं पद्धतीने हजारो वर्षांपासून गुलामीत खंगलेल्या अस्पृश्य – बहुजनांचे ते मुक्तीदाते असल्याने त्यांच्यावर भारतभरातील सर्व उपेक्षित जातसमुहांचे प्रेम होते. मग अश्या महामानवाच्या निर्वाणानावर जगभर हालचाली होणे साहजिक आहे.
बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण दि. ६ डिसें. १९५६ रोजी २४ अलीपुर रोड, नवी दिल्लीच्या बंगल्यात झाले. या घटनेची आठवण सांगताना माईसाहेब आंबेडकर म्हणतात की,
“मी पाहिले की बाबासाहेबांचा पाय उशिला टेकलेला होता. मी साहेबांना दोन – तिन वेळा आवाज दिला, पण त्यांची काही हालचाल दिसली नाही. मला वाटले की त्यांना गाढ झोप लागली असेल, म्हणून मी त्यांना हाताने हलवून उठविण्याचा प्रयत्न केला आणि मला प्रचंड धक्का बसला. साहेबांचे महापरिनिर्वाण झाले होते.”
यानंतर ही बातमी माईसाहेबांनी बाबासाहेबांचा विश्वासू नोकर सुदाम गेणू गंगावणे यांचेमार्फत नानकचंद रत्तू यांच्याकडे पाठवली. पुढे नानकचंदांनाच ही भयावह बातमी प्रसारित करण्यास पुढाकार घ्यावा लागला. त्याचवेळी सोहनलाल व शंकरानंद शास्त्री तसेच टी. बी. भोसले यांच्यामार्फत ही बातमी प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाली. परंतु दरम्यान, डॉ. मालवणकर यांनी कदाचित माईसाहेबांकडून मिळालेल्या वृत्ताचा फायदा घेत बातमी गुप्त ठेवून आपल्या नोकरामार्फत औषधोपचाराचे बिल तत्काळ वसूल केले. ही त्यांची व्यवसाय निती असली तरी ही इतक्या मोठ्या राष्ट्रनिष्ठाबाबत अशी वृत्ती बाळगणे हे दुःखद होते!
पुढे अंत्यविधीचा प्रश्न उपस्थित झाल्यास माईसाहेबांनी सारनाथ हे स्थळ सुचविले. परंतु मुंबई ही बाबासाहेबांची कर्मभूमी म्हणून असलेली लोकेच्छा आणि नेहरूंच्या मार्फत मुंबई हे स्थळ ठरविण्यात आले. त्यात देखील मुंबई येथे विमानाने मृतदेह आणण्यासाठी माईसाहेबांकडे पैसे नसल्याने जगजीवनराम यांच्या मध्यस्थीमुळे ते शक्य झाले. परंतु हा खर्च सर्वस्वी सरकारी होणे अपेक्षित असताना तसे घडले नाही. ज्या महामानवाने जगाला वाटेल असे आदर्शवत संविधान या देशाला बहाल केले, देशाच्या इतिहास आणि संस्कृतीचा आदर करत राष्ट्रनिष्ठा वेळोवेळी दर्शवली, त्यांच्याच अंत्यविधीबाबत अशी चर्चा निष्क्रिय आणि लज्जास्पद होती. तरी देखील त्याच दिवशी संबंधित खर्च केंद्र सरकारने शेड्युल कास्ट फेडरेशनकडून वसूल केला. ‘माझा मंत्रीमंडळातील रत्न’ अशी परदेशी पाहुण्यांना बाबासाहेबांची ओळख करून देणाऱ्या प्रधानमंत्री नेहरूंबाबत ही निराशाजनक बाबच म्हणावी लागेल.
दरम्यान, बाबासाहेबांची प्रेतयात्रा पुढे अलिपुर रोड ते पार्लामेंट स्ट्रीट मार्गे सफरदगंज विमानतळावरून डेकोटो विमानातून ७ डिसें. १९५६ रोजी मुंबईत आणण्यात आले. या घटनेबाबत आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते – साहित्यिक ज.वी. पवार त्यांच्या आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ, खंड १ मध्ये सांगतात की,
“पोलिसांच्या गुप्त अहवालानुसार सांताक्रूझला ५० हजारापेक्षा जास्त लोक हजर होते. पोलिसांचा आकडा फसवा असतो. त्यांनी ५० हजार म्हटले याचा अर्थ १ लाखावर लोक सांताक्रूझला तर दोन लाखांपेक्षा जास्त लोक राजगृहाकडे होते. सांताक्रूझवरून प्रेतयात्रा सुरू झाल्यानंतर ती सकाळी ५:०५ वा. राजगृहाला पोहचली. तेव्हा सुमारे ४ लाख लोक हजर होती. याचा अर्थ ६-७ लाख लोक भल्या पहाटे डिसेंबरच्या कडकडीत थंडीत आपल्या प्रिय नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.”
मुळात बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण म्हणजे बहुजनांसाठी शोककाळ होता. परंतु दर पावलावर एक समस्या उभी राहून त्यांचा अवमान करण्याची संधी ही व्यवस्था सोडत नव्हती. ‘माणूस गेल्यावर शत्रुत्व संपत!’ अशा गप्पा करणारी मानवतावादी मंडळी कुठे लुप्त झाली असेल हे त्यांनाच ठाऊक!
अखेरीस बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराची वेळ येवून ठेपली असतांना स्थळाबाबत नवा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांकडे गिरगाव चौपाटीची मागणी केली असता आंबेडकर द्वेषामुळे ती नाकारण्यात आली. पुढे वडाळा, शिवाजी पार्क या जागेंच्या विचारांती दादर चौपाटी हे ठिकाण ठरविण्यात आले. परंतु संपूर्ण प्रकरणाचा नैतिकतेने विचार केला असता जाणवते की, ज्या नेत्याने या महाराष्ट्राचा विचार करता संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले, त्याच राज्याचे पहिले मुख्यमंत्री मुंबईत त्यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेसाठी नकार देतात. हे मानवी मनाला काळीमा फासण्यासारखे होते.
महामानवाची ही स्थिर अवस्था सर्व सजीवांना दुःख देणारी असली तरी दुःखातून सावरणे कार्यकर्त्यांना क्रमप्राप्त होते. म्हणून त्यावेळी एका त्रकवरील उंच आसनावर बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला. प्रसंगी उपस्थित भिम अनुयायांची संख्या वाढत जाऊन १०/१२ लाखांवर येवून ठेपली होती. बाबासाहेबांना दिल्लीवरून आणलेल्या त्याच सुटात ठेवले होते. गळ्याभोवती मफलर ही त्याच पद्धतीने ठेवला होता. महायात्रेच्या अग्रभागी बुद्धमूर्ती हातात घेवून सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर तर पुत्रवत प्रेम लाभलेले पुतणे पुतणे मुकुंदराव यांच्या हातात मेणबत्तीचे ताट होते. राजगृहापासून खोदादाद सर्कल, परळ ट्राम नाका, एल्फिन्स्टन पुल, गोखले रोड दक्षिण, गोखले रोड उत्तर या मार्गे महायात्रा दादर चौपाटी वर पोहचली. मुंबई सरकारने सरकारी दुखवटा जाहीर केला नसतांना ही गिरण्या, वर्कशॉप, महानगर पालिका – रेल्वे यांची काही खाते रिकामी होते. सर्व अनुयायांनी रीघ ही बाबासाहेबांच्या अंतिम दर्शनाला होती.
आजतागायत इतिहासाने अनेक महामानवांचे जीवन बघितले होते. इतिहास स्वतः त्यांच्या क्रांत्यांची साक्ष बनून उभा होता. परंतु बाबासाहेब एकमेव महामानव होते की त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी ही क्रांती घडली होती. १४ ऑक्टोबर १९५६ च्या दिक्षेनंतर १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या धममदिक्षेचे आयोजन त्याच दिवशी पार पाडले गेले. बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी दादासाहेब भिम अनुयायांना म्हटले,
“बाबासाहेब दीक्षा देणार होते १६ तारखेला. स्वतः चालत येवून तुम्हा सगळ्यांना …. तुमचा हात धरून बुद्धाकडे नेणार होते. पण विपरीत झालं आहे.बाबासाहेबांचे पार्थिव समोर आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बुद्धाला शरण जावूया. भदंत आनंद कौसल्यायन येथे आहेत, तेच तुम्हाला दीक्षित करतील. तथागताच्या धम्मात प्रवेश देतील. ज्यांना ही दीक्षा मान्य असेल त्यांनी हात उंचावून मान्यता द्यावी!”
यास्तव या आवाहनाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यावर सांघिक प्रार्थना आणि पंचशील ग्रहण करून बाबासाहेबांच्या उपस्थितीत एक मोठी धम्मक्रांती घडली. यानंतर चंदनाच्या चितेवर बाबासाहेबांचा देह ठेवून मुंबईच्या महाबोधी सोसायटीचे चिटणीस भिक्खू एच. धम्मानंद, श्रीलंकेचे भिक्खू बुद्धरक्षित एम थेरो, भदंत आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते हा विधी संपन्न झाला.
यानंतर ही बाबासाहेबांच्या विचारांची धग ही संपता संपणारी नव्हती. विषमतावादी संस्कृती आणि धर्म त्यागून बंधुत्वाची शिकवण देणारा धम्म सर्वांना हवाहवासा झाला होता. बाबासाहेबांचे तर महापरिनिर्वाण झाले होते. परंतु त्यांच्या भेटीरुपी मिळालेला धम्म जोपासण्याची इच्छा दांडगी होती. त्यातूनच रविवार दि. ९ डिसेंबर १९५६ ला देखील भदंत आनंद कौसल्यायन यांच्या उपस्थितीत साडे तीन लाख स्त्री – पुरुषांना अस्थी गोळा करण्याआधी दीक्षित करण्यात आले.
या सर्व घटनांचा जोर हा जलद होता. माणसे थबकलेली होती. दाता गेल्याचे भाव हुंदकारुपी बाहेर येत होते. आपल्यासह आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कार प्रसंगी होणारा अवमान गप्प गिळून समुदाय गप्प होता. ही संयमी वृत्ती आणि क्रांतीची जाणीव पित्याच्या वरासाचा भाग नसेल तर काय?
यातच अखेरीस, ९ डिसेंबर रोजी सर्व पक्षीय शोकसभा आयोजित केली असता त्यासाठी मुंबईचे महापौर ‘सालेभाई अब्दुल कासीर’ यांनी अनुपस्थित राहून सर्व भिम अनुयायांचा अवमान केला होता. पुढे मो. वा. दोंदे यांच्या अध्यक्षेखालील ही सभा संपन्न झाली. परंतु महापौरांची गैरहजेरी त्यांच्या काँग्रेसी दृष्टिकोनाची आणि करंटेपणाची भिम अनुयायांना जाणीव करून देणारी होती.
बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण संपूर्ण मानवतावादाला छेद देणारे ठरले. त्यांच्या नसण्याने आंबेडकरी समुदायाला पोरकेपणा जाणवला परंतु तरी देखील. सर्व क्षेत्रात अनेकोत्तर प्रगती करून त्यांनी शक्य त्या संसाधनांच्या बळावर योग्य ती मजल मारली. पुढे भविष्यात अनेक नेतृत्व गद्दार आणि स्वाभिमानशून्य झाले. परंतु बाबासाहेबांच्या अखेरच्या प्रसंगातील अवमान आजही त्यांचा सच्चा कार्यकर्ता स्मरून आपले कर्तव्य पूर्ण करीत आहे. अखेरीस आंबेडकरोत्तर चळवळ याचमुळे तर शाबूत आहे!
सौजन्य | प्रबुध्द भारत