मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील पोलीस भरतीत आता LGBTQ+ समूहातील व्यक्तींनाही संधी मिळणार आहे. महाराष्ट्र सरकार विरुध्द आर्या पुजारी या केसच्या निकालात उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
साताऱ्यातील आर्या पुजारी ही एक ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणून आपली ओळख सांगते. आर्या गेली ४ वर्ष पोलीस भरतीची तयार करत आहे. मात्र पोलीस भरतीच्या फॉर्ममध्ये केवळ स्त्री आणि पुरुष असे दोनच पर्याय असल्याने आर्याला भरती प्रक्रियेत जाता आलं नाही. यासाठी आर्याने न्यायालयात दाद मागितली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पण अखेर आर्याने न्यायालयीन लढाई जिंकत आपल्यासोबतच LGBTQ+ समूहातील अनेक व्यक्तींना आशेचा किरण दाखवला आहे. या सुनावणीवेळी “फेब्रुवारी २०२३ पर्यंत यासंबधी सर्व प्रक्रिया पुर्ण करुन नवी नियमावली तयार करण्यात येईल” अशी माहिती महाराष्ट्र सरकारने न्यायालयात दिली.
दरम्यान, पोलीस खात्यातील भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे. 13 डिसेंबरपर्यंत वेबसाइटवर LGBTQ+ समूहातील व्यक्तींसाठी पर्याय उपलब्ध करण्यात येईल. नियमावलीत सुधारणा करण्यात आल्यानंतर LGBTQ+ समूहातील व्यक्तींसाठी शारीरिक चाचणी केली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल.