कोणताही मूळ भाषिक सिनेमा ज्यावेळी इतर कोणत्याही भाषांमध्ये बनविला जातो, तर त्या संबंधित सिनेमाला ‘रिमेक’ अस म्हटलं जात. गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत अभिनेता रितेश देशमुख याच्या वेड या सिनेमाची जोरदार चर्चा केली जात होती. या सिनेमाच पहिलं पोस्टर रिव्हील झाल्यानंतर रितेश आणि जेनेलिया Riteish and Genelia यांची जोडी या सिनेमात झळकणार असल्याने, त्यांच्या चाहत्यांमध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण निर्माण झालं होत. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा “माजली” या तेलगु सिनेमाचा रिमेक असणार अशा चर्चादेखील सोशल मीडियावर जोर धरू लागल्याने, एका सीनेपत्रकाराने या विषयी विचारणा केली असता, “वेड हा सिनेमा माजली या सिनेमाला प्रेरित होऊन तयार झालेला सिनेमा आहे.” अस स्पष्टीकरण रितेशकडून देण्यात आलं, परंतु या सिनेमाचं कथानक मुळ माजली सिनेमाच्या कथानकाशी अगदी जुळवून आणलेलं कथानक वेडमध्ये दाखविण्याचा प्रयत्न सिनेमाचा अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने केला असला, तरी हा सिनेमा म्हणजे एक प्रकारे फसलेलं ‘वेड’ म्हणावा लागेल.
माजली या सिनेमाच्या मुळ कथानकातल्या प्रसंगांमध्ये काहीअंशी बदल करून वेडमध्ये दाखविण्यात आलेले आहेत. ज्या प्रेक्षकांनी माजली सिनेमा पाहिला असेल, तर त्या प्रेक्षकांना वेडमधल्या बऱ्याच गोष्टी खटकू शकतात. उदा: ‘सिनेमातील पात्र’ या सिनेमातील पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येते. सत्या या नायकाच्या वडीलांच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेते अशोक सराफ(दिनकर जाधव) आणि श्रावणी या नायिकेच्या वडीलांच्या भूमिकेत अभिनेते विध्याधर जोशी(मुरली जोशी) ही दोन्ही पात्र उत्तम पद्धतीने आपापल्या भूमिका चोख बजावतात. वेड या सिनेमाची माजलीशी तुलना न करता फक्त वेडकडे पाहिलं तरी, सिनेमातील एकामागून एक पटापट येणारे प्रसंग आपल्याला चालू प्रसंगांचा विचार न करता कधी पटकन निघून पुढे जातात हे देखील आपल्याला कळत नाही. कोणत्याही सिनेमाच्या कथेची एक दिशा ठरलेली असते, त्यानुसारच त्या सिनेमाची कथा पुढे सरकत जाते. मात्र या सिनेमात चालणारी कथा ही मूळ माजली सिनेमाच्या कथेचा आधार घेऊन त्यामध्ये काहीअंशी बदल करून चित्रित केल्यामुळे याचा परिणाम कथेच्या मांडणीत दिसून येतो.
सिनेमात एकूण चार गाणी आणि शेवटी अभिनेता सलमान खानच क्यमिओ असणार ‘वेड लावलय’ हे गाण आहे. यात प्रामुख्याने “वेड विरह तुझा वणवा” आणि “बेसुरी मी” ही दोन गाणी अप्रतिम झालेली आहेत. दोन्ही गाण्यांमध्ये चित्रित करण्यात आलेले व्हिजुअल्स चांगले जमून आलेले आहेत. खासकरून “बेसुरी मी” या गाण्यामध्ये दिसणारे व्हिजुअल्स, संगीत आणि एडिटींग लाजवाब झालेले आहेत. सिनेमाचा विषय हा मुळातच प्रेमावर आधारलेला आहे, त्यामुळे सिनेमाचं नाव जरी वेड असलं तरी हे वेड प्रेमाचं आहे ही बाब विसरून चालणार नाही. कोणत्याही सिनेमात प्रेम हा विषय हाताळत असताना, पात्रांचं एकमेकांसोबतच बाॅंडिंग असणं खूप गरजेचं असतं, मात्र या सिनेमात हे बाॅंडिंग जाणवत नाही. विशेषकरून सत्या (रितेश देशमुख) आणि श्रावणी (जेनिलिया देशमुख) या दोघांमधल्या नवरा आणि बायकोच्या नात्यामध्ये सिनेमाच्या कथेत दुरावा असला, तरीदेखील तो एक प्रकारचा असणारा सच्चेपणा श्रावणीचं पात्र साकारत असणाऱ्या अभिनेत्री जेनिलिया देशमुखमध्ये दिसत नाही. यामुळे संवाद जरी प्राजक्त देशमुख यांनी उत्तम लिहिलेले असले तरी, अभिनय साकारत असणाऱ्या अभिनेत्री जेनिलिया यांच्या बोलीभाषेमध्ये तुटकपणा वेळोवेळी जाणवत राहतो.
माजलीमधली पूर्णा(नागा चैतन्य) आणि श्रावणी(समंथा) यांची केमिस्ट्री ज्या पद्धतीने जुळून आलेली आहे त्यामानाने रितेश आणि जेनेलिया यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री मात्र फेल ठरलेली आहे. दिग्दर्शकाने केलेली पात्रांची निवड ही त्यांना देण्यात आलेल्या पात्रांशी सुसंगत वाटत नाही. हे सगळ्या पात्रांबाबतीत घडलं आहे असं नाही, पण बऱ्याच पात्रांच्या निवडीबाबतीत घडलेलं आहे. उदा: पोलीस स्टेशनमधल्या प्रसंगामध्ये दाखविण्यात आलेला पोलीस अधिकारी. त्याला देण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत कोणत्याही दृष्टीने बसत नाही, यामुळे अशा प्रकारच्या इतर अनेक पात्रांचा अभिनय हा सुद्धा नैसर्गिक वाटत नाही. सिनेमा रिलीज होण्याअगोदर ज्या प्रकारे या सिनेमाच प्रमोशन करण्यात आलं तसेच बऱ्याच वर्षांनी रितेश आणि जेनिलिया एकत्र काम करणार असल्याने, त्यांच्या चाहत्यांकडून खूप अपेक्षा होत्या त्या सर्व अपेक्षा हा सिनेमा पूर्ण करत नाही. ज्या प्रेक्षकांनी माजली बघितला नसेल त्यांना हा सिनेमा आवडू शकतो. ज्यांनी बघितला असेल त्यांना लेखात नमूद करण्यात आलेल्या गोष्टी समजू शकतात, तरी रितेश आणि जेनिलिया हे दोघे “तेरे नाल लव्ह हो गया” नंतर पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्रित पुनरागमन करीत असल्याने वेड पाहायला काही हरकत नसावी.
सिनेमाप्रेमी
ओंकार दत्तोप्रसाद खेडेकर